Sunday, April 23, 2023

My Feelings

 जुग जुग जिओ...!!!

 संस्कृत मध्ये सचिन म्हणजे पवित्र, शुद्ध . (एका मैत्रिणीला जी संस्कृत शिकवते तिला विचारून हा अर्थ लिहिला आहे.😊 )   खरंच! अगदी नावातच आपल्या स्वभावाची ओळख  सांगणाऱ्या सचिन बद्दल मनात खूप आदर आहे. सचिन उत्तम खेळाडू आहे हे त्रिकालाबाधित सत्य, मात्र सचिनचे आणि आमच्या पिढीचे एक वेगळेच नातं आहे कारण सचिन साधारण आमच्याच वयाचा. त्याच्या प्रत्येक यशा बरोबर आपणही असंच काहीतरी करायला पाहिजे असं वाटतच आम्ही मोठे झालो. आम्ही त्याला आमच्याबरोबर मोठं होताना पाहिलं. मला क्रिकेटमधलं काही कळत नव्हतं आणि खरंतर त्यात फारसा रसही नव्हता कारण मुळातच क्रिकेट म्हणजे फक्त मुलांचा खेळ अशी धारणा असलेल्या पिढीमध्ये आम्ही वाढलो. प्रामाणिकपणे सांगायचं तर खेळाची ही फारशी आवड नव्हती. पण असे असूनही , सचिन नावाचे एक अजब रसायन आहे की जो आपल्याच वयाचाआहे आणि वयाच्या सोळाव्या वर्षापासून या *वंडर बॉय* ने क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतले आहे- हे बघत, ऐकत, वाचत आम्ही मोठे झालो. आम्ही क्रिकेटसाठी नाही तर सचिनला खेळताना बघण्यासाठी  मॅच बघायचो. या वाक्यात अजिबात  अतिशयोक्ती नाही. एक गंमत सांगावीशी वाटते, आमच्या प्रायव्हेट हॉस्टेलवर काम करणाऱ्या एक मावशी यायच्या, त्यांना सचिनला खेळाताना बघायला एवढं आवडायचे की त्या टीव्हीवर तो खेळत असताना टीव्ही  जवळ जाऊन अगदी दृष्ट लागू नये म्हणून बोटे मोडायच्या. त्यावेळी आम्ही त्यांची टिंगल करायचो, त्यांना चिडवायचो देखील पण आता मागे वळून पाहिलं की वाटतं असे किती आशीर्वाद असतील ना या माणसाकडे ??? 

सचिन सगळ्यांना आपला वाटतो कारण त्याच्या डोळ्यातले निष्पाप भाव. अजूनही तो सोळाच वर्षाचा आहे असं वाटतं. एक उत्तम माणूसच असे दिलखुलास हास्य जिवंत ठेवू शकतो.

 सचिन सतत आमच्या आजूबाजूला 

वावरायचा. पोस्टर्सवर, वहयांच्या मुखपृष्ठावर, स्टीकर्सवर. आवडत्या विषयासाठी सचिनचा फोटो असलेली वही केली जायची.( हे वाचताना माझे अनेक मित्र-मैत्रिणी अरे खरंच की !!!असं म्हटल्याशिवाय राहणार नाहीत. )मॅच असली की ज्यांच्या घरात टीव्ही त्याला लाडीगोडी, मधल्या सुट्टीत डबा खाताना सचिनच्याच गोष्टी.हॉस्टेलवरच्या मंतरलेल्या दिवसात तर टीव्ही रूम मध्ये बसायला जागाच नसायची. आमच्या कॉलेजच्या क्रिकेट मॅचेस ला सुद्धा खूप गर्दी व्हायची. कितीतरी आठवणी आहेत!!!

 आज आपल्या सचिनचा पन्नासावा वाढदिवस. आपल्या सर्वांच्या मनावर राज्य करणाऱ्या क्रिकेट विश्वातील यांनी निगर्वी , दिलखुलास , मितभाषी आणि माणूस म्हणून आभाळा एवढ्या मोठ्या असणाऱ्या व्यक्तिमत्त्वास लाख लाख शुभेच्छा!!🌹🌹🌹🌹💐💐💐💐

भारती कपटकर (वाळुंज)

24/ 4/ 2023

Thursday, August 5, 2021

मन जिंकलेला क्षण

 आपला भारतदेश आणि जर्मनी यांच्यामध्ये झालेला हॉकीचा सामना हे संघशक्तीचे एक उत्तम उदाहरण आहे.

      सामन्याबद्दल सगळी माहिती दूरदर्शन आणि वर्तमानपत्रातून आपण घेतलीच आहे. मला मात्र हा सामना एका वेगळ्याच कारणासाठी उंची गाठणारा वाटतो,ती म्हणजे संघशक्ती आणि दुर्दम्य इच्छाशक्ती .भारतीय संघाला तब्बल 41 वर्षानंतर मिळालेल्या संधीचे आपल्या हॉकी वीरांनी कास्यपदक घेऊन सोन तर केलंच पण भारतीयांना फार मोठा धडाही दिला.        संघशक्ती ज्याला आपण Team Spirit असेही म्हणतो ती अगदी आपल्या घरापासून  तर जिथे आपण काम करतो तिथपर्यंत सगळीकडेच खूप महत्त्वाची .प्रत्येक व्यक्ती ही गुणवान असतेच पण तिला तशी संधी मात्र मिळाली पाहिजे किंबहुना मिळवून देण्यासाठी प्रयत्न ही केले पाहिजेत.     United we stand जर लक्षात ठेवले तर आपल्या देशाला आणि अर्थातच त्या बरोबर आपल्यालाही प्रगतीपथावर जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही .                   आणखी एक...... भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याने जर्मनीच्या संघाचे ,त्याच्या खेळाचे आणि आत्मविश्वासाचे भरभरून कौतुक केले, ही गोष्ट छोटीशी असली तरी आहे मात्र डोंगराएवढी . कट्टर प्रतिस्पर्ध्याचेही कौतुक करण्याची खिलाडूवृत्ती फक्त मैदानावरच नव्हे तर प्रत्यक्ष जीवनातही जरी दाखवली तर आयुष्य दडपण न राहता सहज सोपे होऊन जाईल .                                                                  आम्हा भारतीयांना फक्त पदकाचा आनंद न देता जीवनाचे  सार सांगून जाणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे त्रिवार अभिनंदन!!!!!!!

भारती कपटकर--वाळुंज.(6/8/21)


Monday, September 28, 2020

सुरेल लता

 लय आणि ताल यांचा सुरेख मिलाफ म्हणजे 'लतादीदी'.
चिरतरुण आवाजाची देणगी मिळालेल्या लतादीदी म्हणजे सात्विकतेचे मूर्तिमंत उदाहरण.
मंदिरातल्या घंटेचा नाद हा जितका सुमधुर तितकाच त्यांचा आवाजही.एखाद्या रम्य पहाटे शृभ्र वस्त्र परिधान करून, कुंकम लावलेली ललना मंदिराच्या पायऱ्यांंवर  उभी असताना जितकी ओजस्वी दिसते न अगदी तसं मला दिदींंच गाणं वाटतं.
        लतादीदींच्या आवाजाची जातकुळीच वेगळी.कितीही वरच्या सुरात अगदी टिपेलाही तो कानाला इतका गोड लागतो की बस्स!!! वादळवरं सुटलं गं - या गाण्यातली तान,किती सुरेख!!! तसेच त्यांचे गातानाचे श्वासावरचे नियंत्रण ही जादूच
 आहे की काय असं वाटावं. त्यांच्या एकाही गाण्यामध्ये श्वास ऐकू येत नाही. "हम आपके है कोन " या चित्रपटातली गाणी गायली त्यावेळी त्यांचे वय अवघे 65 होते. चॉकलेट लाईमज्यूस 
हे गाणे तर वय विसरून त्या गायल्या आहेत.... लतादीदींच्या सुरांचा परिसस्पर्श लाभलेली असंख्य गाणी ,उल्लेख करावा तरी किती गाण्यांचा?
भय इथले संपत नाही या गीतामधील त्यांचा स्वर शहारे आणतो तर निजल्या तान्ह्यावरी माऊली हे गाणे वात्सल्याचे प्रतीक.
मोगरा फुलला आणि पसायदान जणू  ज्ञानेश्वर महाराजांंनी स्वतः त्यांच्याकडून गाऊन घेतले आहे, इतक्या त्या गाताना एकरूप होऊन गायल्या . अगदी अलीकडे वयाच्या 90 वर्षापर्यंत त्या गायल्या आहेत."आता विसाव्याचे क्षण" हे त्यापैकीच एक गाणे.
जगातील अनेक आश्चर्यांपैकी एक आपल्या दिदींचा आवाज असला तरी त्यांचा जीवनप्रवास बघता हा फक्त दैवी चमत्कार नाही तर अगदी खेळण्याच्या वयापासून केलेल्या अपरिमित कष्टांचा आणि साधनेचा तो परिपाक आहे.
      इतक्या उंचीवर पोहोचण्यासाठी केलेला प्रवास हाच मुळी चमत्कार म्हणावा लागेल.
       लतादीदींबद्दल नुसते बोलण्यासाठी सुद्धा साधना करावी लागेल याची जाणीव मला आहे.त्यांच्यावरील माझे प्रेम व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस माझ्या मदतीला धावून आला हेच खरे.आपण खूप भाग्यवान आहोत की अशी गायिका आपल्या देशाला लाभली.
         ज्यांच्याबद्दल ऊर अभिमानाने भरून येतो अश्या भारतरत्न दिदींना विनम्र अभिवादन!!!!!!!!

      भारती वाळुंज-कपटकर 

28 /9/2020




Thursday, October 17, 2019

प्रिय स्मिता......

प्रिय स्मिता....

       मला न तुला स्मिता न म्हणता' स्मित 'असं म्हणावसं वाटतं कारण तुझ्याइतकं सुंदर स्मितहास्य खचितचं कोणाचे असेल. तु डोळ्यातून हसतेस!!!!! डोळ्यातून हसणारी माणसं खुप सच्ची, खरी असतात असं म्हणतात. बाकी कोणाचे माहीत नाही पण तू मात्र खूप सच्ची आहेस आणि तितकाच तुझा अभिनय. मी आहेस असं म्हणतिये कारण तुझ्या अभिनयाने परिपूर्ण भूमिका तू समोर असल्याची जाणीव करून देतात.
       माझ्यासारखा अनेक चाहत्यांना तुझं जाणं मनाला चटका लावणारं होतं. तुझ्यावर लिहिले गेलेले किती लेख,किस्से,पुस्तकं मी आवर्जून वाचली पण तु वेगळीच आहेस,मुक्त आहेस,गूढ आहेस आणि म्हणूनच हवीहवीशी वाटणारी....प्रत्येकासाठी वेगळी.
        तुला अभिनय करावा लागलाच नाही कारण प्रत्येक भूमिका तु जगलीस. पण आज मला सारखी डोळ्यासमोर दिसतिये ती जैत रं जैत मधली चिंधी .मी रात टाकली या गाण्यामध्ये कॅमेरा फारसा तुझ्या चेहऱ्यावर नाहीच मुळी पण तुझं चालणं अगदी अस्सल ठाकराच्या युवतीचे.  ती तू आहेस खरीखुरी चिंधी नाही हे सांगूनही पटणारं नाही. चालण्याचाही अभिनय असू शकतोआणि तसेच चिंधी कशी आहे हे अवघ्या तीनमिनीटाच्या गाण्यात दाखवून देणाऱ्या तुला मी काय म्हणु????
       शालिन ,निरागस असं तुझं मराठमोळं सौंदर्य हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एक अढळ स्थानं निर्माण करून गेलं.
तु फार लवकर exit घेतलीस पण जेवढी होतीस तेवढी अजुनही भरून आहेस आसमंतात.
       तुला आठवताना   'नभ उतरू आलं' ...... असा वाटतंय खरं...

                             भारती कपटकर -वाळुंज
                                  17 -10-2019

Sunday, September 8, 2019

तुम जियो हजारो साल.......

आशा!!!!......ज्यांच्या नावातच चैतन्य आहे अशा मधाळ  आवाजाच्या  गायिका आशाताई भोसले यांचा आज वाढदिवस . आपल्या भारतदेशाला लाभलेल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वांपैकी एक लाघवी आणि हवंहवंसं माणूस म्हणजे आशा ताई. नाच रे मोरा...सारख्या निरागस बालगीतापासून तर अगदी   -भोगले जे दुःख ज्याला सुखं म्हणावे लागले...... या अगदी हृदयद्रावक गीताला आपल्या स्वरांचे कोंदण देणाऱ्या आशाताई आपल्या मनावर राज्य करतात .एकाच वेळी अनेक रूपं घेण्याची जादूच जणूं त्यांच्यामध्ये आहे. कुठलेही पात्रं असो की प्रसंग , ते गाणं आशाताई इतकं बेमालूमपणे गातात की ते पडद्यावरची व्यक्तीच गाते आहे असं वाटावं .  त्यांचं हे गाण्यात विरघळून जाणं मनाला फार फार भावतं!!!!! 
       खरंतर त्यांना रंगमंचावर लांबूनच बघितलंय अणि एरवी दूरदर्शनवर  पण त्यांच्या जादुई आवाजामुळे ,दिलखुलास हसताना पडणाऱ्या खळीमुळे आणि नर्म विनोदी संवादशैलीमुळे अगदी आपल्या होतात. इतक्या अतूलनिय गायिकेबद्दल लिहिण्याची माझी योग्यता ती किती पण हे आतलं मनात साठलेले ....
          फक्त गायिका म्हणूनचं नव्हे तर आयुष्य भरभरून जगण्याची ओढ ही आशाताईंना एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. 
एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी  ...... या गाण्याचा सोहळा  करणाऱ्या आशा ताईंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा....
                   भरती वाळुंज --कपटकर
                    8-9-2019

Saturday, August 31, 2019

माझा बाप्पा

प्रिय बाप्पा


खरं तर मी फार काही  श्रद्धाळू नाही . पूजाअर्चा , होमहवन , उपासतापास यांच्या तर वाट्यालाही जात नाही .




रोज संध्याकाळी देवघरात दिवा लावून , शुभंकरोती म्हणून अगदी मनापासून नमस्कार करून                       




तू फक्त   "ताकद दे " अशी हक्काची मागणी करणारी मी , या दहा दिवसांची आतुरतेने वाट पाहत असते .




तुझ्या येण्याच्या कल्पनेने सुद्धा घराघरात नवंचैतन्य निर्माण होते . पुरण पोळी  ,मोदक आणि रोज प्रसादासाठी




गोडधोड पदार्थ करून दमायलाही होत नाही . या दहा दिवसात हॉटेलची आठवणही येत नाही .




काय घेऊन येतॊ स रे तू ? चैतन्य ,  ऊर्जा , बरोबर ना  ?




            खरंतर  तू अगदी कणाकणात आहेस , हे आम्हाला माहित नाही असे मुळीच नाही , पण वर्षभर  पुरेल




अशी ऊर्जा द्यायला तुला अगदी असं , स्पेशल यावं  लागतं  , हो ना ?




संध्याकाळी आरती साठी लगबगीने  सगळे घरी पोहचतात आणि त्या निमित्ताने दूरदर्शन  मालिकांच्या




पात्रांबरोबर नव्हे तर तुझ्या बरोबर अंगत पंगत होते . अहाहा !!! काय छान  वाटते सांगू !




जीन्स टॉप्समधील लाडक्या , त्यांच्याच भाषेत  "अगदी एथिनिक " होऊन  जातात . मोबाइल वरचे  हात




प्रार्थनेसाठी जोडले जातात . नव्या पिढीची बोटे ढोल ताशांच्या नादात अगदी लयदार होतात . बाप्पा तुझ्यात






असं काही तरी  आहे की  भारवल्यासारखे  आम्ही तुझ्या भोवती रुंजी घालतो . तु  घरात आहेस म्हणून घराला  




कुलूप लावून बाहेर न जाण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आणि कधी आमच्या Home चे Sweethome होऊन




जाते हे कळतच नाही . या साठी तुला खुपसारे मोदक !!!!!




           बाप्पा आता हेच बघ रोज नवनवीन विषयांवर लिहिण्याचा फक्त दृढनिश्चय करणारी मी प्रत्यक्षात




 मात्र लिहिती झाले ते तू दिलेल्या प्रेरणेमुळेच . हे माझे लिखाणाचे पहिले पुष्प तुझ्या चरणी अर्पण  !!!!!!




                                                                                                           तुझीच भारती वाळुंज-कपटकर