जुग जुग जिओ...!!!
संस्कृत मध्ये सचिन म्हणजे पवित्र, शुद्ध . (एका मैत्रिणीला जी संस्कृत शिकवते तिला विचारून हा अर्थ लिहिला आहे.😊 ) खरंच! अगदी नावातच आपल्या स्वभावाची ओळख सांगणाऱ्या सचिन बद्दल मनात खूप आदर आहे. सचिन उत्तम खेळाडू आहे हे त्रिकालाबाधित सत्य, मात्र सचिनचे आणि आमच्या पिढीचे एक वेगळेच नातं आहे कारण सचिन साधारण आमच्याच वयाचा. त्याच्या प्रत्येक यशा बरोबर आपणही असंच काहीतरी करायला पाहिजे असं वाटतच आम्ही मोठे झालो. आम्ही त्याला आमच्याबरोबर मोठं होताना पाहिलं. मला क्रिकेटमधलं काही कळत नव्हतं आणि खरंतर त्यात फारसा रसही नव्हता कारण मुळातच क्रिकेट म्हणजे फक्त मुलांचा खेळ अशी धारणा असलेल्या पिढीमध्ये आम्ही वाढलो. प्रामाणिकपणे सांगायचं तर खेळाची ही फारशी आवड नव्हती. पण असे असूनही , सचिन नावाचे एक अजब रसायन आहे की जो आपल्याच वयाचाआहे आणि वयाच्या सोळाव्या वर्षापासून या *वंडर बॉय* ने क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतले आहे- हे बघत, ऐकत, वाचत आम्ही मोठे झालो. आम्ही क्रिकेटसाठी नाही तर सचिनला खेळताना बघण्यासाठी मॅच बघायचो. या वाक्यात अजिबात अतिशयोक्ती नाही. एक गंमत सांगावीशी वाटते, आमच्या प्रायव्हेट हॉस्टेलवर काम करणाऱ्या एक मावशी यायच्या, त्यांना सचिनला खेळाताना बघायला एवढं आवडायचे की त्या टीव्हीवर तो खेळत असताना टीव्ही जवळ जाऊन अगदी दृष्ट लागू नये म्हणून बोटे मोडायच्या. त्यावेळी आम्ही त्यांची टिंगल करायचो, त्यांना चिडवायचो देखील पण आता मागे वळून पाहिलं की वाटतं असे किती आशीर्वाद असतील ना या माणसाकडे ???
सचिन सगळ्यांना आपला वाटतो कारण त्याच्या डोळ्यातले निष्पाप भाव. अजूनही तो सोळाच वर्षाचा आहे असं वाटतं. एक उत्तम माणूसच असे दिलखुलास हास्य जिवंत ठेवू शकतो.
सचिन सतत आमच्या आजूबाजूला
वावरायचा. पोस्टर्सवर, वहयांच्या मुखपृष्ठावर, स्टीकर्सवर. आवडत्या विषयासाठी सचिनचा फोटो असलेली वही केली जायची.( हे वाचताना माझे अनेक मित्र-मैत्रिणी अरे खरंच की !!!असं म्हटल्याशिवाय राहणार नाहीत. )मॅच असली की ज्यांच्या घरात टीव्ही त्याला लाडीगोडी, मधल्या सुट्टीत डबा खाताना सचिनच्याच गोष्टी.हॉस्टेलवरच्या मंतरलेल्या दिवसात तर टीव्ही रूम मध्ये बसायला जागाच नसायची. आमच्या कॉलेजच्या क्रिकेट मॅचेस ला सुद्धा खूप गर्दी व्हायची. कितीतरी आठवणी आहेत!!!
आज आपल्या सचिनचा पन्नासावा वाढदिवस. आपल्या सर्वांच्या मनावर राज्य करणाऱ्या क्रिकेट विश्वातील यांनी निगर्वी , दिलखुलास , मितभाषी आणि माणूस म्हणून आभाळा एवढ्या मोठ्या असणाऱ्या व्यक्तिमत्त्वास लाख लाख शुभेच्छा!!🌹🌹🌹🌹💐💐💐💐
भारती कपटकर (वाळुंज)
24/ 4/ 2023
Beautifully written
ReplyDeleteWoww! Happy Birthday Sachin :)
ReplyDelete